Ad will apear here
Next
उत्खनन


‘गुहाचित्रांमध्ये आढळलेल्या पहिल्या मानवाच्या हाताच्या ठशांपासून आजतागायत आपण एका ओघवत्या प्रवाहाचा भाग आहोत. या अर्थानं, आपण कधीच मरत नाही!’ असं म्हणणारा तो – बेसिल ब्राउन. 

१९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट जॉन प्रेस्टनच्या ‘द डिग’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे... आणि ही कादंबरी Sutton Hoo या प्रत्यक्षातल्या उत्खननावर आधारित आहे...! जॉन प्रेस्टनची नातेवाईक या उत्खननातल्या टीममध्ये होती.

चित्रपटातल्या पहिल्या काही दृश्यांमध्येच त्या उत्खननात काय सापडेल, याची उत्सुकता आपल्या मनात जागृत होते. चित्रपट पुढे सरकतो तसा पुरातत्त्वशास्त्रातला आजवर महत्त्वाचा मानला जाणारा शोध तिथे लागतोच; पण माणसांच्या भावभावनाही खोदून काढणारी अनेक तरल दृश्यं यात आहेत. उत्खननाबरोबरच तिथे पोहोचलेली पुरातत्त्वशास्त्र जाणणाऱ्या माणसांची टीम, त्यांच्यातले नातेसंबंध जरा सावकाशपणे उलगडत राहतात. 

सगळ्यांनाच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याआधी हे उत्खनन संपायला हवं असतं. त्या सगळ्यांची लगबग, लोकांमध्ये युद्धाबद्दल असलेली भीती, आप्तस्वकीयांची काळजी तुकड्यातुकड्यात समोर येते. 



या सगळ्या पार्श्वभूमीवर चित्रपटातला महत्त्वाचा घटक आहे माइक एली हा सिनेमॅटोग्राफर. वर्डस्वर्थच्या कवितेत दिसणारी अनेक मनमोहक निसर्गचित्रं आणि उत्तम कलाकुसर असलेल्या गोष्टींनी भरलेल्या पण काळोख्या, बंदिस्त भिंतींमधले क्षण असा contrast चित्रपटात ठळकपणे जाणवतो. 

ऊन, वारा, पाऊस, दिवसरात्र, हिवाळ्यातली थंडी, पाणी, जमीन, गवताचे तुरे, इवलीशी फुलं, घनदाट जंगल, मोकळं मैदान. रात्र, टेलिस्कोपमधून दिसणारा चंद्र, रात्रीचं आकाश. या मोकळ्या वातावरणात सगळ्यांच्या मनाची दारंही खुली आहेत. तिथे स्पर्धा, हेवेदावे, प्रेम, दु:ख, उन्मुक्तपणा सगळं मनमोकळेपणाने व्यक्त होताना दिसतं. 

घरातल्या भिंतींमधल्या बंदिस्त दृश्यांमध्ये मात्र सगळ्यांच्याच मनातले काळोखे कोपरे जागृत होतात. एकाकी, विफल, विषण्ण, असहाय, वेदनामय असे क्षण घरातल्या दृश्यांमध्ये जास्त डोकावतात. भिंतींचा, पडद्यांचा सफेदसर रंगही उभारी देत नाही. तो भकास वाटतो. 



या सगळ्या प्रसंगांमध्ये मागे वाजणाऱ्या पियानोमुळे प्रसंगांमधल्या भावच्छटा जास्त गहिऱ्या होतात! 

चित्रपटात इतर व्यक्तिरेखा, त्यांची सुखदु:खं दिसत राहतात; पण त्या व्यक्तिरेखा, त्यांच्यातले प्रसंग बेसिल आणि एडिथच्या आयुष्याइतके आपल्या आतपर्यंत पोहोचत नाहीत.

आपल्या कामाचं मूल्य जाणणारा, कणखर, दणकट, स्वावलंबी, चिखलमातीत काम केल्यानं रापलेला, आपल्यातल्या गुणदोषांची उत्तम जाण असणारा, अभ्यासू, एकाकी, अंतर्मुख स्वभावाचा आणि पॅशनेट असा बेसिल राल्फ फिएन्स या अभिनेत्यानं विलक्षण तन्मयतेनं साकारला आहे. ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘द कॉन्स्टंट गार्डनर’, ‘द इंग्लिश पेशंट’ अशा चित्रपटांमधला हा माझा लाडका अभिनेता. डॅनियल क्रेगच्या बाँडपटात त्यानं ‘एम’देखील साकारला आहे. या चित्रपटातला त्यानं रंगवलेला बेसिल पॅशनेट आहे. आपल्या कामापलीकडे त्याला काही दिसत नाही. लॅटिन भाषेपासून भूगर्भशास्त्रापर्यंत त्यानं अभ्यास करून चक्क पुस्तकंही लिहिली आहेत. 

‘आपण केलेलं उत्खनन पाण्यानं भरू नये म्हणून मध्यरात्री तो भर पावसात ते झाकायला जातो...’ असे प्रसंग त्याची उत्कटता दाखवतात. एका प्रसंगात चिमुकल्या रॉबर्टची समजूत काढताना ‘आपण सगळेच रोज अपयशाचा सामना करतो. आपण कितीही कष्ट केले तरी काही गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळत नाही,’ हे त्याचं वाक्य त्याची आयुष्याबद्दलची खोलवर समज सांगून जातं.

एडिथ प्रिटी या बुद्धिमान, सुंदर, निर्णयक्षम, एकाकी, जराशा गूढ व्यक्तिमत्त्वाचं काम केरी मुलिगन या अभिनेत्रीनं केलंय. एडिथचा सिंगल मदर असल्यानं दिसणारा एकटेपणा त्या भल्यामोठ्या इस्टेटीवर उठून दिसतो. तिच्या आजारपणामुळे आपल्यामागे मुलाचं काय होईल याची तगमगही त्रास देऊन जाते.

चित्रपटातल्या व्यक्तिरेखा आपापल्या भूतकाळाचं ओझं खांद्यावर घेऊन उत्खनन करत असतात; पण बेसिल मात्र वर्तमानच काय भविष्यकाळाचाही वेध घेताना दिसतो. एडिथचा लहानगा, चुणचुणीत मुलगा रॉबर्ट. त्याला बेसिलचं आकर्षण वाटतं. बेसिलच्या टेलिस्कोपमधून तो आकाशाचं निरीक्षण करतो तेव्हा अंतराळसफरीची स्वप्नं पाहतो. १९३९मध्ये अवकाशयात्रा शक्य नव्हती. त्याआधी टेलिस्कोपही नव्हते. या चित्रपटात भूतकाळ वर्तमानाशी टेलिस्कोपनं जोडला जातो आणि रॉबर्टच्या अवकाशयात्रेच्या स्वप्नानं वर्तमानकाळ भविष्यकाळाशी जोडला जातो.



आपण आपल्या खांद्यावर इतिहासाचं ओझं घेऊन चालत असतो. भविष्यातल्या अनेक संधी आपल्यासमोर येतात, नाहीशा होतात. त्यातली एक आपल्यातलं माणूसपण जागवणारी संधी ओळखून आपण पुढे गेलो तर मानवजातीच्या इतिहासात आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होऊ शकेल, असं हा चित्रपट पाहून वाटलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, प्रत्यक्षातल्या बेसिलला त्याच्या उत्खननाचं श्रेय सुरुवातीला मिळालं नाही. नंतर मात्र एडिथच्या बरोबरीनं त्याचं नाव या उत्खननाशी जोडलं गेलं!

‘द गुड द बॅड द अग्ली’मधला एक संवाद आठवल्यावाचून राहत नाही. There are two kinds of people in the world those with guns and those that dig.

- नीलांबरी जोशी


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OUFRCW
Similar Posts
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास ‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात.
बाँबे रोझ : उत्कट भावस्वप्न मांडणारा अॅनिमेशनपट ‘मुंबई’ या गुलजारच्या कवितेतल्या ओळींसारख्या ‘बाँबे रोझ’ या (नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या) अॅनिमेशनपटातल्या व्यक्तिरेखा प्रत्येक फ्रेममध्ये रंगांच्या छटा आणि भावच्छटा घेऊन साकार होत जातात.
असा प्रीतीचा नाद अनाहत..! चित्रपटाच्या शेवटी ‘पण हे सगळं करून तू आनंदात राहशील का’ या जेरीच्या प्रश्नावर शार्लोट म्हणते, ‘आपल्या दोघांनाच जाणवणारा आपल्यातल्या प्रेमाचा तो मंतरलेला प्रदेश आपल्यात जिवंत असताना, प्रेमाचा अनाहत नाद आपल्याला ऐकू येत असताना, फक्त आपल्या नजरेला दिसणारा चांदण्यांचा झिलमिलता प्रकाश समोर असताना आपण चंद्राची
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून...! अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागवणारा मानव उत्क्रांत होत गेला तशा दया, करुणा अशा उन्नत समजल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना त्याच्यात रुजत/दृढ होत गेल्या. तसं इस्टवूडनं सुरुवातीच्या चित्रपटात गुन्हेगार, मग इन्स्पेक्टर आणि नंतर मानसिक गुंतागुंत जाणणारा, दया, करुणा, प्रेम आणि मदतीचा हात पुढे करणारा नायक रंगवला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language